पुण्यातील ट्विटर वॉर रस्त्यावर; भाजपच्या कार्यालयात निघालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले
By राजू इनामदार | Published: June 1, 2023 05:54 PM2023-06-01T17:54:12+5:302023-06-01T17:54:29+5:30
आम्ही कसलेही आंदोलन करणार नव्हतो, तर भाजपच्या शहराध्यक्षांना काँग्रेसभवनची माहिती देणारी एक पुस्तिका देणार होतो, काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत
पुणे: काँग्रेसभवनवरून रंगलेले भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमधील ट्विटर वॉर गुरूवारी थेट रस्त्यावर आले. काँग्रेसभवनच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात निघालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले. आम्ही तुमची नंतर भेट घालून देतो असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली व त्यांना परत पाठवले.
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन यांनी पोलिस भाजपनेच पाठवले असल्याचा आरोप केला. आम्ही कसलेही आंदोलन करणार नव्हतो, तर भाजपच्या शहराध्यक्षांना काँग्रेसभवनची माहिती देणारी एक पुस्तिका देणार होतो असे ते म्हणाले. मात्र पोलिसांनी विनाकारण हस्तक्षेप केला व आम्हाला तिथे जाण्यापासून थांबवले अशी माहिती जैन यांनी दिली.
भाजपच्या केंद्रातील सरकारची ९ वर्ष भाजपच्या शहर शाखेने साजरी केली. त्यावरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सत्तेच्या ९ वर्षात भाजपने पुणे शहरासाठी काहीच केले नसल्याची टीका केली. त्याला उत्तर देताना शहर भाजपने, काँग्रेसकडून तरी राजवाड्यासारखे काँग्रेसभवन बांधण्याशिवाय दुसरे काय झाले असे ट्विट केले. काँग्रेसच्या चैतन्य पुरंदरे यांनी त्याला रिट्विट करत, काँग्रेसभवनसारख्या त्यागातून उभे राहिलेल्या वास्तूविषयी अशी भावना बाळगणाऱ्यांची कीव करावीशी वाटते म्हटले.
युवक काँग्रेसचे जैन तसेच राहूल शिरसाट, प्रथमेस अबनवे, हनमत पवार संतोष पाटोळे, स्वप्निल नाईक, वाहिद निलगर, केतन जाधव, परवेज तांबोळी व अन्य कार्यकर्ते गुरूवारी सकाळी काँग्रेसभवनमध्ये जमा झाले. त्याची माहिती पोलिसांना समजली. त्यांनी लगेचच काँग्रेसभवसमोर बंदोबस्त लावला. जैन तसेच अन्य कार्यकर्ते तिथुन बाहेर पडण्याच्या तयारीतच होते, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवले. आम्ही भाजपच्या शहराध्यक्षांना पुस्तिका देणार आहोत असे जैन यांनी त्यांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. आम्हीच तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो, आता मात्र थांबा असे आवाहन त्यांनी केले असल्याची माहीती जैन यांनी दिली.
लोकशाही खरोखरीच शिल्लक आहे का?
काँग्रेसभवन ही काँग्रेसची फक्त वास्तू नाही. त्याला मोठा इतिहास आहे. स्वातंत्ऱ्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या इमारतीला वेगळे महत्व आहे असे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देणार होतो. त्यासाठी एक पुस्तिकाही आम्ही आणली होती. ती देण्यासाठीची प्रतिबंध होत असेल तर लोकशाही खरोखरीच शिल्लक आहे का असा प्रश्न पडतो.- अक्षय जैन- प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस