पळसदेव - दिवाळीचा पहिला दिवस हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा ठरला. भिगवण ते डाळज या डेंजर झोन पट्ट्यात मंगळवारी पहाटे भादलवाडी येथे दोन लक्झरी बसचा अपघात होऊन सहा जण जखमी झाले, तर दुपारी डाळज क्रमांक २ येथे टेम्पोने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा टायर फुटल्याने नादुरुस्त अवस्थेत भादलवाडी गावच्या हद्दीत उभी होती. याच वेळी पाठीमागून दुसरी बस आली व त्या बसला धडकली. या झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. अपघाताची तीव्रता भयानक होती. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश भोसले व हायवे पेट्रोलिंग मोबाईलमधील पोलीस अप्पा भांडवलकर, राजकुमार कोकरे, हेमंत दळवी, सुहास पालकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. तर, डाळज क्रमांक २ येथे दुसºया झालेल्या अपघातात टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बंडू शिंदे (वय ४५, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर दोन अपघात, एकाचा मृत्यू : ६ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 1:14 AM