लोणी काळभोर : छावा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) दोघेही रा. शिव कॉलनी, आदर्श नगर, दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. दोघा आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या यूनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदारांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना आरोपींविषयी माहिती मिळाली. पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलीस ठाण्यात मकोका तसेच दरोड्याची तयारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील दोन आरोपी हडपसर मधील वैभव टॉकीज परिसरात छावा चित्रपट बघण्यासाठी आले असल्याचे समजले. त्यानंतर युनिट सहाचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने त्याठिकाणी जावून भादा आणि भोंड यांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपींना दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.