लोणी काळभोर : कोल्हापूर येथे २९ वर्षांपूर्वी दरोडा टाकून फरार झालेल्या आंतरराज्य रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार ज्वालासिंगच्या टोळीतील दोन फरार आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट ( वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे ) व अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत उर्फ कंजारभट ( वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे ) या दोन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
मुरगुड ( जि. कोल्हापूर ) येथे २९ वर्षापूर्वी दाखल असलेल्या दरोडयाच्या दोन गुन्हयातील दोन फरारी आरोपी उरूळी कांचन व यवत परिसरात राहत असल्याची शुक्रवारी ( २ ऑक्टोबर ) रोजी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर निचित, प्रमोद नवले यांनी त्या भागात वेषांतर करून फरारी आरोपींची माहिती काढली असता ते नावे बदलून तेथे राहत असल्याची समजले. शुक्रवारी ते ऊरुळी कांचन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपींना पुढील तपासासाठी मुरगुड पोलीस स्टेशन ( जिल्हा कोल्हापूर ) पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
ज्वालासिंग कंजारभाट हा आंतरराज्य रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रासह परराज्यात खुनासह दरोडा , जबरी चोरी असे सुमारे १५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. गुन्हे केल्यानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फरार त्याची टोळी फरार होत असत. त्यामुळे त्यांचाशोध घेत असताना अडचण येत होती. आपला एन्काउंटर होईल या भीतीने ज्वालासिंग १९९९ मध्ये पोलिसांना शरण आला होता. सध्या तो शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात आहे.