पुणे : परदेशातील नामांकित हॉस्पिटल येथे काम करण्यासाठी वर्क व्हिसा मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ४ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ दरम्यान घडला असून निखिल प्रकाश साठे (वर - ३७, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे हे एक हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. अमेरिकेमध्ये नामांकित हॉस्पिटलमध्ये कामासाठी जागा रिक्त आहे असा त्यांना अनोळखी ई-मेल आयडीवरून ई-मेल आला. साठे यांनी काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. अमेरिकेत काम कारण्यासाठी वर्क व्हिसा आवश्यक असून मिळवून देतो असे सांगून फिर्यादींकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी, प्रोसेसिंग फी अशी वेगवेगळी कारणे सांगून साठे यांच्याकडून एकूण २ लाख ७३ हजार रुपये उकळले. साठे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी खडक पोलिसांनी अज्ञात ई-मेल धारकांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षण सुनील माने पुढील तपास करत आहेत.