- विजय सुराणा
वडगाव मावळ (पुणे) : अनेक जण पैसा कमाविण्यासाठी भारत देश सोडून परदेशात नोकरीनिमित्त जातात. हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, ‘भारत देश महान’ हा अभिमान बाळगून परदेशातील अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून एका व्यक्तीने मावळ तालुक्यात रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. आज ते वर्षाकाठी अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल करीत असून, त्यांच्या नर्सरीतून देशभरात रोपवाटिकेला मागणी आहे.
भाऊसाहेब नवले (वय ५१) (मूळ गाव अकोला तालुक्यातील कुंभेफळ) हे सध्या मावळ तालुका तळेगाव एमआयडीसीत राहतात. नवले बीएससी ॲग्री झालेले आहेत. शिक्षणानंतर त्यांनी २५ ते ३० वर्षे नोकरी केली. इथोपिया देशात त्यांनी नोकरी केली. त्यांना अडीच लाख रुपये पगार, सर्व सुविधा होत्या. पण, आपण देश सोडून इकडे आलो आहोत ही खदखद मनात होती. आपल्या देशात काही तरी व्यवसाय करता येईल का, हा विचार त्यांनी केला. २५ वर्षांची नोकरी सोडून त्यांनी मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी येथे ग्रीन ॲण्ड ब्मुम्स या नावाने नर्सरी सुरू केली.
ऐन कोरोनात अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली
जगभरात गेल्या अडीच वर्षांत कोरोनाने डोके वर काढल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. नोकऱ्या गेल्या; मात्र अशा परिस्थितीत नवले यांनी कोरोनाकाळात स्वत:चा व्यवसाय सुरू करून भरारी घेतली. दहा वर्षे इथोपियामध्ये पाॅलिहाउसचा अनुभव होता. गुलाब उत्पादनाचा पहिल्यापासूनच अनुभव होता. ऐन कोरोनात अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली. नवले यांनी सुरुवातीला २७ गुंठ्यांत सुरू केलेला व्यवसाय आता एक एकरात झाला आहे. या नर्सरीत शंभर ते सव्वाशे प्रकारच्या रोपांची लागवड करतात. संपूर्ण देशभरात या रोपांची विक्री केली जाते. त्यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केला आहे. आज त्यांची कोट्यवधी रुपयांची व्यवसायात उलाढाल होत असून, त्यांच्या नर्सरीत २० हून अधिक जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.