पुणे : युक्रेन आणि रशिया या दोन देशातील तणावामुळे मागील दोन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झाला आहे. सोने-चांदीचे भाव ४८ हजार रुपये प्रति तोळ्यावर ५० हजार ५०० रुपये झाले आहेत. दोन महिन्यात जवळपास अडीच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी ६२ हजार ७०० वरून थेट ६६ हजार ९०० रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, आता रशिया-युक्रेनचा वाद निवळला असल्याने सोने-चांदी या मौल्यवान धातूचे नजीकच्या काळात दरवाढ होणार नाही, असे पुण्यातील काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
सोने-चांदीचे दर
दिनांक-सोने (प्रति तोळा)-चांदी (प्रति किलो)
१ जानेवारी-४८०००-६२७००
१३ फेब्रुवारी-५०५००-६६९००
महिनाभरात अडीच हजाराची वाढ
गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भाव सतत वाढत आहे. तसेच येत्या काळात सोने ५५ हजार रुपये प्रतितोळा होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात अडीच हजार रुपयांनी सोने महागले आहे.
सोने-चांदी स्थिर राहणार
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वादामुळे जगात तणावाचे वातावरण होते. त्याचा परिणाम सोने-चांदीवर झाला आहे. मात्र, हा तणाव निवळल्याने आता कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही, असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
रशिया-युक्रेनचा वाद आता निवळला आहे. त्यामुळे सोने-चांदीची यापुढे दरवाढ होण्याची शक्यता नाही. महिनाभरात दरवाढीचे मुख्य कारण रशिया-युक्रेनचा तणाव हेच होते. या तणावाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला होता. पुण्यात त्यामुळे जवळपास अडीच हजार रुपयांनी सोने महागले होते. आता दर स्थिर होतील.
- अभय गाडगीळ, सराफ व्यावसायिक