नदीपात्रातील राडारोडा काढण्यासाठी टिपर वाहने खरेदी केली जाणार असून, प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. पालिकेला एकूण सात निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये सर्वात कमी रकमेची निविदा मे. टाटा मोटर्स लि. मुंबई यांच्याकडून प्राप्त झाली आहे. निविदेचे पूर्वगणनपत्रक २ कोटी ७५ लाख ६० हजार रुपयांचे होते. टाटा मोटर्सची निविदा १२.६३ टक्क्यांनी कमी असल्याने त्यांचेकडून वाहन खरेदीस मान्यता मिळावी, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
पालिकेला एक टिपर २४ लाख ०८ हजार (जीएसटी व वाहतूकखर्चासह) पडणार आहे. असे दहा टिपर पालिका खरेदी करणार असून, २ कोटी ४० लाख ८० हजार रुपयांना खरेदी केले जाणार आहेत. एकीकडे शहरात नदी सुधारणेसाठी हजारो कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. नदीकाठ सुधारणा आणि जायका प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याची कामेही सुरू केली जाणार आहेत. मग, पालिकेला टिपर खरेदी करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.