लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारुची विक्री सर्रास होत असल्याचे बोलले जात होते. वारजे माळवाडी येथील रामनगरमध्ये त्याचा पोलिसांना प्रत्यय आला. रामनगरमधील खान वस्तीमधील एकाच खोली तब्बल ७३ कॅनमध्ये २ हजार ५५५ लिटर गावठी दारु भरून ठेवल्याचे गुन्हे शाखेने घातलेल्या छाप्यात आढळून आले.
गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार राजेंद मारणे यांना वारजे माळवाडी येथील रामनगरमधील खान वस्ती रोडला गावठी दारुचा साठा करून ठेवण्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा घातला. बालाजी राजाराम पवार आणि अमोल दिलीप तिकोणे हे तेथे थांबले असल्याचे आढळून आले. त्यांच्या खोलीत जाऊन पाहिल्यावर तेथे १ लाख ८८ हजार ३०० रुपयांची २ हजार ५५५ लिटर तयार गावठी दारु ७३ कॅनमध्ये भरलेली आढळून आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.