पुणे : अपघातातील वाहन परत करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागून ८ हजार रुपये घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे (वय ४४) आणि पोलीस शिपाई संदीप भिमा रावते (वय ३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते मंचर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.
याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणावर अपघाताबाबत डिसेबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे याच्याकडे होता. अपघातातील वाहन तक्रारदारासह परत देण्यासाठी मदत करतो म्हणून साळुंखे व रावते यांनी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. या तक्रारीची पडताळणी करताना दोघांनी तडजोडी अंती ८ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंचर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ सापळा रचला. संदीप रावते याने शनिवारी तक्रारदाराकडून ८ हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मंचर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहे.