पुणे : एटीएम कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. पुण्यातील लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करुन नाशिकमधील एटीएम सेंटरमधून १ लाख रुपये काढण्यात आले होते, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७) , मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय ३७, दोघे रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मोहम्मद फैजन फारुख छत्रीवाला याने त्याच्या साथीदारासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो मागील ३ वर्षापासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार आहे. हा गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे २ वर्षे दुबई मध्ये पळून गेला. तो डिसेंबर २०१९ मध्ये भारतात परतला होता.
पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. यादृष्टीने पोलिसांनी तपास करत दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्याकरिता लागणारा कलर प्रिंटर असा माल जप्त केला आहे. याप्रकरणी डेनिस मायकल (वय ३२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. मायकल यांच्या खात्यातून ३० नोव्हेंबर २० रोजी नाशिक येथील एटीएम सेंटर वरून १० ट्रानझाक्शन करून १ लाख रुपये काढण्यात आले. याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अशाप्रकारचे 2२०० ते २२५ गुन्हे पोलिसांकडे आल्याने त्याबाबत तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला असता ते नाशिक येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांचे पथक नाशिकला जाऊन त्यांनी आरोपी ताब्यात घेतले. सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे, संदेश कर्णे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, नितीन चांदणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
.........
नायजेरियन आरोपी गजाआड
पुणे - हडपसर भागात सातवनगर येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मध्ये स्कीमर आणि पिन होल कॅमेरा लावून ग्राहकांची डेबिट कार्ड माहिती आणि पिन क्रमांक चोरी करण्याचा प्रयत्न एका आरोपीने बुधवारी सायंकाळी आठ वाजता केला. पण, बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आणि बँकेने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार आरोपीचा सायबर सेलच्या पथकाने शोध घेऊन लुक्कास विल्यम (वय ३१, रा. हंडेवाडी, पुणे, मु.रा. नायजेरिया) याला अटक केली. मागील सहा वर्षापासून तो भारतात बेकायदेशीर पध्दतीने राहत आहे.
-------------------------------------------