चाकण : अवैध शस्त्रसाठा जवळ बाळगणाऱ्या तीन जणांच्या टोळक्यापैकी दोन सराईतांना चाकण पोलिसांनी सोमवारी (दि.१७) बेड्या ठोकल्या आहेत, तर एक अट्टल गुन्हेगार फरार झाला. अटक करण्यात आलेल्यांकडून तीन गावठी बनावटीच्या पिस्तुलासह सात जिवंत काडतुसे असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रमोद ऊर्फ अंकित किशनराव भसके (वय २५, रा. चाकण), दत्तात्रय सूर्याजी कडूसकर (वय ३४, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (रा. नाणेकरवाडी, चाकण) हा फरार झाला आहे. सराईत गुन्हेगार अक्षय गोविंद पाटील व त्याचा मित्र प्रमोद किसनराव भसके यांनी विक्रीसाठी गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे आणलेले असून, त्यांच्यापैकी प्रमोद भसके हा नाणेकरवाडी येथील आळंदी फाटा येथे गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व गुन्हे पथकासह आळंदी फाटा येथे सापळा लावला. या पथकाने प्रमोद ऊर्फ अंकित किशनराव भसके याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये ठेवलेले एक असे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व अंगावरील पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे मिळून आली. प्रमोद भसके यांच्याकडे पिस्तूल व काडतूसबाबत अधिक चौकशी करता त्याने सांगितले की, मित्र अक्षय गोविंद पाटील यांच्यासह एकूण ४ पिस्तुल व काडतुसे विक्रीच्या उद्देशाने आणली होती. त्यापैकी एक पिस्तुल व काडतुसे असे अक्षय पाटील यांच्याकडे आहे. तसेच मी दोन पिस्तुले विक्रीसाठी येथे घेऊन आलो होतो. व आम्ही १ पिस्तूल व ३ राउंड असे दत्तात्रय सूर्याजी कडुसकर यास विक्री केलेले आहे. अशी माहिती सांगितल्यावरून चाकण पोलिसांनी दत्तात्रय यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळाले. वरील सराईतांकडून एकूण ३ गावठी बनावटीचे पिस्तूल व ७ जिवंत काडतुसे असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा अवैध शसत्र साठा जप्त करण्यात आला.