लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरल्यानंतर पळून गेलेल्या मित्राचे पैसे एका हॉटेल व्यावसायिकाला मागणाऱ्या लाईनबॉयसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे.
अजय शिंदे (रा. खडक पोलीस वसाहत, कल्याणीनगर) आणि गौरव आहुजा (वय २०, रा. टिळक रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन पोटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अजय शिंदेचे वडील पोलीस कर्मचारी होते. अजय शिंदेवर यापूर्वी मारामारीचे गुन्हे असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले होते. सचिन पोटे हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी उमेश अशोक मुलचंदानी (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश मूलचंदानी याचे दुकान आहे. गौरव आहुजा याच्या वडिलांचे विमाननगर येथे हॉटेल आहे. पण त्याला वडिलांच्या हॉटेलमध्ये बसायचे नव्हते. त्यासाठी त्याने ऑनलाईन बेटिंगचा व्यवसाय सुरु केला. गौरव व उमेश हे ओळखीचे आहेत. मी बेटिंगचा व्यवसाय सुरु केला असून कोणाला खेळायचे असेल तर सांग, असे गौरवने उमेशला सांगितले.
उमेशच्या ओळखीचा रजत ग्रोवर याने बेटिंगविषयी विचारल्यावर त्याने रजतला गौरवकडे पाठविले. गौरवकडे ऑनलाईन बेटिंग खेळात रजत हा अडीच लाख रुपये हरला. मात्र गौरवला पैसे न देताच तो पळून गेला. त्यामुळे तू त्याला पाठविले होते, त्याने पैसे दिले नाहीत, आता ते पैसे तू दे, असा तगादा गौरवने उमेशकडे लावला. त्यावर, मी जर खेळलो नाही तर तुला कशाचे पैसे देणार, असे उमेश म्हणाला. त्यानंतर अजय शिंदेने उमेशला फोन केला आणि धमकी देऊन अडीच लाखांची खंडणी मागितली. याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने तातडीने हालचाल करुन गौरव आहुजा आणि अजय शिंदेला अटक केली.
याबाबत पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सांगितले की, या ऑनलाईन बेटिंगमध्ये अनेक बड्यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे.. आहुजा ही त्यातील एक लिंक आहे. गौरव आहुजा आणि फिर्यादीच्या संभाषणात अजय शिंदे हाही या बेटिंगमध्ये आहुजाचा ‘पार्टनर’ असल्याचा उल्लेख आहे. त्यादृष्टीने तपास चालू आहे.