पुणे : विकत घेतलेल्या वाड्याची साफसफाई करीत असलेल्या तरुणाला येथे राहायचे असेल, तर १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईच्या दरम्यान पोलिसांना धमकावण्याचा प्रकार घडला. त्यावरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद अली मेहदी गंजी (वय ५०) आणि अली अकबर मेहदी गंजी (वय ४८, दोघे रा. केदारीनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अब्बास गंजी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी गुरुवार पेठेतील वाडा विकत घेतला आहे. ते मित्रासह शनिवारी सकाळी वाड्याची साफसफाई करत होते. त्या वेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी ‘अगर तुझे यहा पे रहना है तो मुझे १० लाख रुपये देना पडेगा, नही तो हम तेरे को यहा नही रहेने देंगे, तेरे हात पैर तोडके तेरे को खलास करे, मेरी उपर तक पोहोच है, असे म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बलटु घाडगे व त्यांचे सहकारी तेथे आले. तेव्हा त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून, अरेरावीची भाषा वापरुन शिवीगाळ केली. घाडगे यांना आमची ओळख तुमच्या खात्यात कुणापर्यंत आहे, हे तुम्हाला दाखवतो, अशी धमकी दिली. याप्रकारानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.