पुणे : अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर गुगल पे ने ५० हजार रुपये जमा करून लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
दत्तात्रय हिरामण पिंगळे ( वय ३३, रा.देऊळगावगाडा, ता. दौंड जिल्हा पुणे) आणि अमित नवनाथ कांदे (वय २९, कमलविहार गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, ता.हवेली जिल्हा पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोमवारी (दि. १३) दुपारी पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथे एक ट्रक वाळू वाहतूक करताना आढळला. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी ट्रक थांबविण्यास सांगितला. ट्रकचा मालक दत्तात्रय पिंगळे याने कोलते यांना लाचेचे प्रलोभन दिले. मात्र तहसीलदारांनी स्पष्टपणे नकार दिला. तरी देखील कोलते यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते.
खडक पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक करीत आहेत.
--------------------------------------------