आळेफाटा (पुणे) : पिंपळगाव जोगा कालव्याचे वरील आळे व परिसरातून चोरीस गेलेल्या विद्युतपंप चोरीचा तपास लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एका दुचाकीसह तीन लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
ऋषिकेश बाळासाहेब भंडलकर (रा. आळे डावखरवस्ती, ता. जुन्नर) व शहजाद ली इद्रीशी (आळे फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चोरीच्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. तपासादरम्यान पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असता गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना कळले की, ऋषिकेश भंडलकर हा कालव्यावरील व शेतामधील इलेक्ट्रिक मोटरी चोरत असून तो त्यांची विक्रीसुद्धा करतो, अशी गुप्त माहिती बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. यानंतर त्याला ताब्यात घेत विद्युत पंप चोरीसंदर्भाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल करत दोन मुलांसह एकूण १७ मोटारी चोरल्याचे सांगितले. या चोरलेल्या मोटारी त्याने शहजाद इद्रिसी यास विकल्याने त्याला अटक केली. पोलिसांनी एका दुचाकीसह तीन लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे १७ विद्युत पंप हस्तगत केले.