पुणे : कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणार्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रोडवरील एका वैद्यकीय चाचणी करणार्या लॅबच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लॅबच्या व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावाने हे दोघे बनावट रिपोर्ट देत होते. लोकांच्या मागणीनुसार ते निगेटिव्ह, पॉसिटिव्ह रिर्पोट देत होते. समोरचा व्यक्ती कसा आहे, हे पाहून ते कोणतीही तपासणी न करता रिपोर्ट देत होते. डेक्कन पोलिसांना मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक अभिजित कुदळे, इनामदार, देवडे, शिंदे, पाटील, पानपाटील यांनी या दोघांना पकडले. असा उघडकीस आला प्रकार
सागर हांडे आणि दयानंद खराटे हे दोघे पूर्वी एका लॅबमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांना रिपोर्ट कसे तयार करतात, याची माहिती होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना वेगवेगळ्या कामासाठी कोरोना चाचणी केल्याचा व ती निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट हवा असतो. काहींना प्रवास करायचा असतो, त्यासाठी तातडीने रिपोर्ट कोठे मिळेल, याची लोक चौकशी करीत. त्यातून हे दोघे संबंधितांना तातडीने रिपोर्ट देण्याचे आश्वासन देऊन संबंधितांच्या घरी जाऊन सँपल घेत. त्यासाठी ते आवश्यक ती सावधगिरी व किट घालून जात असत. त्यानंतर त्यांना हवा तसा रिर्पोट देत. अनेकदा सँपल घेतलेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, यावरुन निगेटिव्ह अथवा पॉसिटिव्ह रिपोर्ट देत असत.
जंगली महाराज रोडवरील या लॅबच्या एका ग्राहकालाही त्यांनी बनावट निगेटिव्ह रिपोर्ट दिला. मात्र, त्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याने लॅबला फोन करुन आपल्याला त्रास होत असताना माझा निगेटिव्ह रिपोर्ट कसा आला, अशी चौकशी केली. लॅबच्या व्यवस्थापकांनी त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर त्यांच्या लॅबमधून अशा प्रकारचा कोणताही रिपोर्ट देण्यात आल्याचे आढळून आले़ नाही. त्यामुळे आपल्या नावावर कोणीही बनावट रिपोर्ट देत असल्याचे लक्षात आल्यावर लॅब व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. गेल्या एक महिन्यांपासून ही जोडगळी बनावट रिर्पोर्ट देत असल्याचे सांगत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.