स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३०, रा. रेणापूर, रूपचंदनगर तांडा, ता. रेणापूर, जि. लातूर) व अर्जुन ऊर्फ अजय बालाजी जाधव (वय १९, रा. औसा हनुमान, खंडोबागल्ली, लातूर, जि. लातूर) या दोघांना लातूर येथून ताब्यात घेतले आहे.
शनिवार (२७ मार्च) रोजी हेमंत करे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) व त्याचा मित्र हे दोघेजण दुचाकीवरून पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुणेकडे जात होते. ते रात्री दोनच्या सुमारास रावणगाव (ता. दौंड) गावचे हद्दीत शिवआई मंदिराजवळ आले. त्या वेळी दोन अज्ञात इसमांनी सोलापूर रोडने पाठीमागून येवून त्यांचे स्प्लेंडरला बुलेट मोटरसायकल आडवी मारून स्प्लेंडरची चावी जबरदस्तीने काढून घेवून फिर्यादी व त्याचे मित्राचा मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख १ हजार ८०० रुपये रोख असा एकूण ६७ हजार ८०० रुपयाचा माल मारहाण करून जबरीने चोरुन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
त्याबाबत फिर्यादीने दोन अनोळखी इसमांविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास केली व सोलापूर, लातूर या ठिकाणी तपास पथक पाठवून दोघांना लातूर येथून ताब्यात घेतले व त्यांच्याकडील काही मुद्देमाल हस्तगत केला.
गुन्ह्याचा पुढील अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजपुरे यांनी केलेली आहे.