लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केशवनगर आणि मांजरी येथे बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन ठिकाणी छापे टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सात लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ५७) आणि नरेंद्र भारत काळे (वय २५, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर उज्ज्वला प्रल्हाद भंडारी हिच्याविरोधात तक्रार दाखल आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४६ नुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत विभागातील एस. बी. हांडगर यांनी फिर्याद दिली आहे. बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २१) ही कारवाई झाली. छाप्यात सॅक्रिन, सायट्रिक अँसिड, तीन किलो क्लोरल हायड्रेड, तयार ताडी रसायने आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. भंडारी हा त्यांची पत्नी उज्ज्वला व चालक काळे यांच्या मदतीने या वस्तूंची विक्री करीत, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे. आरोपींना अटक करून शुक्रवारी (दि. २३) लष्कर न्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अँड. संतोषकुमार पताळे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
------------------------------------------