पुणे : महावितरणच्या खांबावरील ट्रान्सफार्मरमधील ऑईलचे नुकसान करून एक लाख ५० रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉईलची चोरी केल्याप्रकरणी मूळ उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक करण्यात आली. २५ ते २८ जूनदरम्यान रात्री १० वाजता हा प्रकार बालेवाडी येथील मिटकॉन चौक येथे घडला. आरोपींना न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मोहम्मद फारूख रोशन चौधरी (वय ३३, जानकीपाडा रांज ऑफिस शेजारी वसई, ठाणे मूळ गाव मलगय्या, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) आणि कृष्णबिहारी रामभरोसे यादव (वय २९ रा. टिटवाळा बनेली चौक ता. कल्याण जि. ठाणे, मूळ बलरामपूर, उत्तर प्रदेश) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. तांब्याच्या वाईडिंग कॉईल चोरून नेल्याप्रकरणी मनोज प्रभाकर नेमाडे (वय ३८, गणेश अपार्टमेंट, गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी चोरी केलेल्या वायर कुठे ठेवल्या? याबाबत तपास करायचा आहे. अटक आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यांनी पोलादपूर, माणगाव, भोईसर, रसायनी आणि नाशिक येथे चोरी केल्याचे सांगितले आहे. पोलादपूर आणि भोईसर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर अनुक्रमे ५ गुन्हे दाखल आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने तो मान्य करीत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.