पुणे : दोन जेसीबींसह सहा लाख रुपयांचे साहित्य चोरल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
क्रिस्टीन पॉल (वय ५०), सदू मेरगळ (वय ४८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका भंगार व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. ४ ते ६ जून २०२१ या कालावधीत वाघोली परिसरात ही घटना घडली.
वाघोली गावच्या हद्दीत दोन जेसीबी, एक जनरेटर, एक क्रशरची लोखंडी जाळी, लोखंडी लोडर कन्वेअर असा मुद्देमाल चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या इतर साथीदारांना अटक करण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.