पिंपरी : दिवसाढवळ्या पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात गोळीबार करून व्यावसायिकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच इतर नऊ आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले (दोघे रा. सांगवी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव), असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौकात शनिवारी (१८ डिसेंबर) सकाळी भर चौकात योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, नीलेश मुरलीधर इयर, गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले यांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींची सोशल मीडियावरून दहशत
खून प्रकरणातील मुख्य आरोपी अश्विन चव्हाण याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिस्तूल घेऊन स्टेटस ठेवले. तसेच काही डायलाॅगबाही देखील आहे. यातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतानाही त्याच्या या स्टेटसला अनेकांनी लाईक आणि कमेंट केले. त्याच्या स्टेटसला लाईक, कमेंट करणाऱ्यांची सर्व माहिती पोलिसांच्या सायबर सेलकडून संकलीत करण्यात येणार आहे.
लोकेशन, तांत्रिक विश्लेषण
खून प्रकरणानंतर पळून गेलेल्या आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी त्यांच्या ठावठिकाण्याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा माग काढण्यात येत आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके देखील रवाना झाली आहेत.