लेण्याद्री (पुणे) : कबाडवाडी (ता. जुन्नर) येथे पंधरा मिनिटांच्या कालावधीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार युवक जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वारांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना जुन्नर वनपरिक्षेत्रात घडली.
देवराज सिंग (वय २३, रा. सोमतवाडी, ता. जुन्नर) हा युवक त्याच्या मित्रासोबत कबाडवाडी गावापासून जुन्नरच्या दिशेने येत होता. यावेळी कबाडवाडी गावच्या ओढ्याच्या पुढे आल्यानंतर अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये देवराज सिंग याच्या मांडीला बिबट्याचा दात लागला. तर पंधरा मिनिटांच्या अंतराने वैभव गवारी (वय २७, रा. वैष्णवधाम, ता. जुन्नर) हा युवक जुन्नरकडून कबाडवाडीच्या दिशेने चालला असताना, त्याच ठिकाणी बिबट्याने त्याच्यावरही अचानक हल्ला केला. यात गवारी याच्या उजव्या पायाच्या घोट्याला बिबट्याचे नख लागले.
नशीब बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून सुदैवाने बचावल्याचे गवारी याने सांगितले. दोन्ही युवकांवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याचे जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडी-झुडपे काढावीत तसेच रस्त्याच्या बाजूने पथदिवे बसविल्यास बिबट्याचे हल्ले कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी माजी उपसरपंच मनेष बुट्टे पाटील यांनी केली आहे.