पुणे : पुण्यातील वडगाव बुद्रुक भागात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा मजुरांपैकी दोघांचे मृतदेहा नागपूरकडे रवाना झाले आहेत. उर्वरित मृतदेह जवळच्या विमानतळांवर पाठवण्याची आखणी पुणे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारातील सीमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यु झाला़.सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली़. राधेलाल रामनरेश पटेल (वय २५), ममता राधेलाल पटेल (वय २२, दोघे रा़ हातादाडु, नवागड, जि़ बेमेतरा, छत्तीसगड), जेतूलाल पटेल (वय ५०), प्रदेशनिन जेतूलाल पटेल (वय ४५, रा़ रायपूर), जिंतू चंदन रावते (वय २३), प्रल्हाद चंदन रावते (वय ३०, दोघे रा़ पारडी, ता़ लांची, जि़ बालाघाट, मध्यप्रदेश) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत़. यातील काही मृत छत्तीसगड तर काही व्यक्ती मध्य प्रवेशामधील आहेत. त्यांचे पार्थिव विमानाने पाठवण्याची तयारी पुणे जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. त्यापैकी जिंतू चंदन रावते आणि प्रल्हाद चंदन रावते या दोन भावांचे पार्थिव नागपूरकडे रवाना झाले असून सोबत काही नातेवाइकांचाही समावेश आहे. नागपूरहुन शववाहिकेतून रायपूर येथे नेण्यात येईल. उर्वरित मृतदेहही जवळच्या विमानतळांवर पोचवण्याची तयारी सुरु आहे. याच पद्धतीने शनिवारी झालेल्या अपघातातील १५ मृतांचे पार्थिवही पुणे जिल्हा प्रशासनाने रवाना केले होते.