पुणे : कोंढव्यात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कोंढवापोलिसांनी दोघा बांधकाम संस्थेतील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्या पाठोपाठ बिल्डर असलेल्या दोघा भावांना रात्री अटक केली़. विवेक सुनिल अगरवाल (वय २१) आणि विपुल सुनिल अगरवाल (वय २१) अशी अटक केलेल्या दोघा भावांची नावे आहेत़. ते अॅल्कॉन लँडमार्कस या बांधकाम कंपनीचे भागीदार आहेत़. अॅल्कॉन स्टायलस या इमारतीतील लोकांनी संरक्षक भिंतीला तडे गेले असल्याचे लेखी तोंडी तसेच ई-मेल करुन कळविले असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आल्याने कोंढवा पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली आहे़. पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी बिल्डिंग उभारणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कांचन डेव्हलपर्सच्या पंकज व्होरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आल्कन स्टायलस उभारणाऱ्या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आल्कन स्टायलस लँडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जगदीशप्रसाद अग्रवाल (64), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (34), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (27), विवेक सुनिल अग्रवाल (21), विपूल सुनील अग्रवाल (21) या पाच जणांबरोबर साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला. पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या तिघांसह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.