भीमाशंकर : प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी शाळेत लवकर जाण्यासाठी तयार होणाऱ्या दोन भावंडांचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी भीमाशंकर येथे घडली. आदित्य (वय १७) आणि अभिषेक नवनाथ पांडे (वय १४) अशी या भावंडांची नावे आहेत. शाळेत लवकर जायचे म्हणून हे दोघेही एकाच वेळी बाथरूममध्ये गेले. लवकर पाणी गरम व्हावे म्हणून गॅस गिझरचा वेग वाढवला, यामुळे मोठ्या प्रमाणात गरम पाण्याची वाफ तयार झाली, या वाफेमध्ये दोघेही गुदमरले व त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराजवळ राहणाऱ्या या दोन्ही मुलांचे वडील देवस्थानमध्ये काम करतात. ही दोन्ही भावंडे तळेघर येथील शाळेत शिकतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत जाण्यासाठी दोघेही उत्साही होते. सकाळी आवरत असताना मोबाईलवरून मित्रांशी शाळेत किती वाजता पोहोचायचे, कोणत्या एसटी बसने जायचे अशी चर्चा त्यांनी केली. ७.३० च्या गाडीने जायचे ठरल्यावर दोघेही एकत्र बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले. या वेळी पाणी लवकर गरम व्हावे म्हणून गॅस गिझरचा वेग त्यांनी वाढवला. यामुळे गॅस गिझरच्या वरच्या भागातून वाफ बाहेर आली. तसेच नळाद्वारेही पाण्याबरोबर वाफ बाहेर पडली. मुलांनी बाथरूममध्ये गेल्यावर दरवाजा आतमधून बंद केला होता. बाथरूममधील खिडकी छोटी असल्याने ही वाफ बाहेर जाऊ शकली नाही. यामुळे बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साइड तयार झाला. यामुळे त्यांच्या शरीराला ऑक्सिजन न मिळाल्याने दोघेही बेशुद्ध पडले. पंधरा मिनीट झाले, तरी मुले बाथरूममधून बाहेर येईनात म्हणून आई पाहायला गेली, तर अभिषेक व त्याच्या अंगावर आदित्यपडलेला दिसला. आईने आरडाओरडा करून बाजूच्या नातेवाइकांना बोलावले. भीमाशंकरमध्ये डॉक्टर नसल्याने लगेच त्यांना १३ किलोमीटरवरील तळेघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. येथे नर्सने मुलांना तपासून ३४ किलोमीटरवरील घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. येथे आणल्यावर डॉ. नंदकुमार पोखरकर यांनी तपासले असता दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे समजताच घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात आईवडील व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला. २६ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात एकच शोककळा पसरली.
घोडेगाव पोलीस ठाण्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार व त्यांच्या सहकार्याने तत्काळ पंचनामे करून दिले. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले व दुपारी तीन वाजता भीमाशंकरमध्ये मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसुमदाय जमला होता. शवविच्छेदनातही मुलांचा गुदमरून मृत्यू झालाचे निष्पन्न झाले.
....तर दोन्ही भावंडांचा जीव वाचू शकला असता.भीमाशंकरमध्ये रुग्णालय नसल्याने तसेच सध्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने मुलांना तातडीची सेवा मिळू शकली नाही. तसेच, १०८ ही रुग्णवाहिकेची सेवाही नसल्याने त्यांना तातडीने दुसºया रुग्णालयात हलविता आले आले नाही. या दोन्ही सेवा या ठिकाणी असत्या तर दोन्ही भावंडांचा जीव वाचू शकला असता.