---------
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील (जाकमाथा) शिवारात येथील शेतकरी वैभव तांबे यांचे शेतात ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. शेतमालकांनी त्वरित वन विभागाशी संपर्क केला. त्यांनी बछड्यांना ताब्यात घेतले व परिसरात त्या बछड्यांचा आईचा अर्थात मादी बिबट्यांचा शोध घेतला. मात्र त्यांना मादी बिबट्या आढळला नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये ऊसतोड करण्याची भीती बसली आहे.
सहा एप्रिल रोजी या परिसरात बछडे सापडले होते, त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीरात चिप टाकून त्यांना पुन्हा वनात सोडले होते. त्या बछड्यांच्या शोधात फिरणाऱ्या मादीला ते बछडे सापडले व तिने त्यांना पुन्हा वनात नेले, मात्र त्यानंतर सोमवारी पुन्हा तेच बछडे सापडले. वन अधिकाऱ्यांनी बछड्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या शरीरातील चिप त्यांना आढळले. त्यामुळे त्या बछड्यांची वैद्यकीय तपासणी करून बछड्यांना पुन्हा एकदा मादीला सापडावेत अशा परिसरात बछड्यांना सोडण्यात आले. मादीने पुन्हा त्या बछड्यांचा यशस्वी शोध घेतला व सायंकाळपर्यंत बछड्यांना घेऊन सुमारे पाचशे मीटर लांबपर्यंत प्रवास केला.
बछड्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करणे व मादीसाठी पुन्हा वनात सोडण्याची कामगिरी माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. निखिल बनगर, वन विभागाचे वनरक्षक सुदाम राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी घोडके यांनी केली.
--
फोटो क्रमांक : २७ ओतूर बिबट्या
फोटो--- बिबट्याची पिले हातात घेतलेले ओतूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.