खंडाळा-लोणावळाच्या मध्ये एक्प्रेस वेवर आज भीषण अपघात झाला. हजारो लीटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला आणि भीषण आगीचे लोळ उठले. हा अपघात पुलावर झाल्याने ते पेट्रोल खाली पडले. परंतू, याच रस्त्याखालून स्थानिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यावरून जाणारी माय लेकरे होरपळली आहेत.
आगीने वेढलेले पेटते पेट्रोल अंगावर पडल्याने स्कूटीवरून जाणारी महिला आणि तिची दोन मुले भाजली आहेत. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात टँकर चालकाचाही समावेश आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अद्याप मृतांची व जखमींची ओळख पटलेली नाहीय. पोलीस मृतांची ओळख पटवत आहेत.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर
परंतू या मायलेकरांपैकी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. ही महिला कुणेगाव येथील एका बंगल्यामध्ये माळीकाम करते. तिथे ती तिचा मुलगा आणि अन्य एका मुलाला घेऊन जात होती. टँकर पलटून पेटला तेव्हाच तिची स्कूटर त्या पुलाखाली आली आणि ते पेटते पेट्रोल त्यांच्यावर कोसळले. ही महिला गंभीररित्या भाजली आहे.
पुलावर लागलेल्या आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. आगीची माहिती समजताच लोणावळा शहर पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा व इतर सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
अग्नीशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. त्यातच पाऊस देखील आल्याने आग विझविण्यास मदत झाली. अतिशय भयंकर अशी ही घटना असून संपूर्ण परिसरास आगीचे लोट पहायला मिळत होते. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईपुणे एक्सप्रेस वे बंद करण्यात आला होता. दुपारी दिडनंतर आग नियंत्रणात आल्यानंतर पुण्याचे दिशेने जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती.