पुणे : वारजे माळवाडी आणि भवानी पेठ, रास्ता पेठेत दहशत माजविणाऱ्या दोघा गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून त्यांची एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शेखर रवींद्र खवळे (वय २०, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे) आणि अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (वय २३, रा. चुडामण तालमीसमोर, भवानी पेठ) अशी या दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत.
शेखर खवळे या सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोयता, लाकडी बांबु अशी हत्यारे घेऊन तो फिरत असतो. खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे ८ गंभीर गुन्हे गेल्या ५ वर्षात त्याच्या नावावर दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. त्याची आयुक्तांनी मंजूर देऊन शेखर खवळे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
अरबाज शेख हा त्याच्या साथीदारांसह खडक, लष्कर, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चॉपर, लाकडी दंडुके अशा हत्यारासह फिरत असतो. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, दुखापत, दंगा, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे असे गेल्या ५ वर्षात १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे व भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाही. त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी अरबाज शेख याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला. त्याची पडताळणी करुन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी त्याला मंजुरी देत एक वर्षासाठी शेख याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे पाऊल आयुक्तांनी अवलंबिले आहे. गेल्या एक वर्षात त्यांनी आतापर्यंत ४१ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.