पुणे : हेरॉईनची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारवाड्याजवळ अटक केली असून, एक किलो १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक कोटी रुपये एवढी किंमत आहे. अजित भानाजी सोढा (वय २५, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई), चंदन मेवालाल माळी (वय २६, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) अशी दोघांची नावे आहेत. हेरॉईन विक्रीसाठी दोघेजण शनिवारवाड्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विठ्ठल खिलारे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शनिवारवाड्याजवळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर दोघे जण मुंबईहून मोटारसायकलवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्यात आले होते. सोढा हा मूळचा गुजरात येथील असून, त्यामुळे हे हेरॉईन गुजरात पाकिस्तान बोर्डरवरून पुण्यात आणले असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांना पुण्यात हेरॉईन पोहोचविण्याचे प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार होते. गुजरात व पाकिस्तानच्या सीमेवरून हे अमली पदार्थ आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नवले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, कर्मचारी विनायक जाधव, राकेश गुजर, ज्ञानदेव घनवट, कुणाल माने, राजेंद्र बारशिंगे, रामचंद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोघांकडून एक कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
By admin | Published: January 26, 2016 1:46 AM