किरण शिंदे
पुणे: पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी अकिब आणि त्याचे मित्र कल्याणी नगर परिसरातील बॉलर पबमध्ये पार्टी करुन घरी परतत होते. त्याचवेळी कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकी वरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर बड्या बापाच्या मुलाने अपघातग्रस्त चारचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरिकांनी त्यांची दुचाकी अडवून चालकाला बाहेर काढत जबर चोप दिला. येरवडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न..
अपघातानंतर बिल्डर असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या बापाने एका आमदारामार्फत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाऐवजी दुसरा व्यक्ती गाडी चालवत होता, हे त्याला दाखवायचे होते. मात्र, प्रत्यक्षदर्शींमुळे त्याचा हा प्रयत्न फसला.
विना नंबरची गाडी रस्त्यावर आलीच कशी..
नवीन वाहन विकत घेताना नंबर प्लेट लावल्याशिवाय शो रूमच्या मालकाला ग्राहकाला गाडी देणे हा गुन्हा आहे. असे असताना एवढी महागडी कार नंबर प्लेट शिवाय ज्या शोरुमकडून देण्यात आली, त्या शो रूमच्या मालकावर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आरटीओ प्रशासनाकडून एरवी सर्वसामान्यांसाठी नियमांची सरबत्ती लावली जात असताना, पैशांच्या जोरावर अशा बड्या लोकांसाठी सगळे नियम धाब्यावर बसवून गाडी दिलीच कशी गेली हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
अल्पवयीन मुलाच्या बापावर गुन्हा दाखल होणे गरजेचे..
कल्याणीनगर, विमाननगर, मिल्स परिसरात असंख्य पब आहेत. दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येत असतात. नियमानुसार मध्यरात्री दीड नंतर कोणताही पब सुरू ठेवणे हा देखील गुन्हा आहे. असे असताना, अल्पवयीन मुलाच्या हातात पैशांच्या मस्तीमुळे आलिशान चारचाकी वाहन देणे, हा देखील गुन्हा असल्याने त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल होणे मोटार वाहन कायद्यानुसार गरजेचे आहे. तसेच दीड नंतर संबंधित पब सुरू कसा होता, हा देखील महत्त्वाचा प्रश्न असून पोलिस आयुक्त आता यावर नेमकी काय कारवाई करणार हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.
यात नेमके दोषी कोण-कोण?
नियमानुसार या गंभीर प्रकरणामध्ये भरधाव वेगाने वाहन चालवणारा तो बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा, त्याचे पालक हे मुख्य जबाबदार आहेतच. मात्र, याशिवाय विना क्रमांकाची कार देणारा संबंधित शो-रूमचा मालक, पोलिस प्रशासन, आरटीओ आणि हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारा ‘तो’ आमदार देखील दोषी आहे. आता पोलिस नेमके कुणाकुणावर कारवाई करणार आणि गेलेल्या दोन जिवांना कसा न्याय मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.