राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:22 IST2025-04-01T12:22:18+5:302025-04-01T12:22:38+5:30
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या योजनांचे सादरीकरण करणार

राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी येत्या ४ आणि ५ एप्रिलला पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, तसेच महत्त्वाचे महसूल अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार संबोधित करणार आहेत.
बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेल येथे ४ आणि ५ एप्रिल रोजी ही कार्यशाळा पार पडणार आहे. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक संचालक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, महसूल विभागाचे सर्व अपर आयुक्त, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे सर्व सहसचिव, उचसचिव, सर्व अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत राजस्तरीय धोरण आणि त्यांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी यांच्यात समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या योजनांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच नवीन संकल्पना मांडून त्यावर चर्चा होईल. या योजनांचा अवलंब करून जिल्हा आणि विभागीय पातळीवर प्रशासन अधिक प्रभावी कसे करता येईल, यावर विचारमंथन होईल. हा विभाग राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असल्याने या कार्यशाळेचे परिणाम राज्याच्या प्रशासनावर दूरगामी प्रभाव टाकू शकतात.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचे कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम पुण्यातच झाले आहेत. उत्तम पायाभूत सुविधा, सोयीस्कर स्थान आणि प्रशासकीय महत्त्व यामुळे पुणे हे राज्य सरकारच्या कार्यक्रमांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे.