पुणे : शहरात रविवारी झालेल्या वादळी पावसानंतर सोमवारी (दि. १०) कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अर्थात बुधवारपर्यंत शहरात सरासरी कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १३ व १४ एप्रिल रोजी पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवेची विसंगती कमी झाल्याने स्थानिक पातळीवर आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी वातावरण निरभ्र होते. कमाल तापमान वाढले असून, ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. सरासरी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाजीनगर येथे ३७.१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. त्याचवेळी वडगाव शेरीत कमाल तापमान दोन अंशांनी जास्त होते. येथे ३९.१ अंश सेल्सिअस तापमान होते. तर जिल्ह्याचा विचार केल्यास तळेगाव ढमढेरे येथे पारा चाळिशीत पोहोचला आहे. येथे सोमवारी ३९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘हवेच्या विसंगतीमुळे सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शहरात रविवारी जोरदार पाऊस झाला. मात्र, पुढील दोन दिवस स्थिती काहीशी निवळली आहे. त्यानंतर १३ व १४ एप्रिलदरम्यान अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक विसंगतीमुळे ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.