- जयवंत गंधाले
हडपसर : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पैसे नाहीत म्हणून चार दिवस काम करून कमावणे हा एकच उद्देश. कामासाठी पुण्यात आल्यावर त्याने निवारा शोधला तोदेखील पुणे-सासवड रस्त्यावरील कॅनॉलच्या पुलाखाली. मात्र, अचानक कॅनॉलचे पाणी वाढले आणि गेली तीन दिवस कठड्याचा आधार घेत आपल्याला वाचवण्याची हाक देत राहिला.
ही कहाणी आहे एका ६० वर्षीय गृहस्थाची. जो जीवाच्या आकांताने येणाऱ्या-जाणाºयांना हाक देत होता. अचानक येथील महिलांना ते दिसले आणि त्या महिलांनी बच्चूसिंग यांना सांगितले. त्यांनी व त्यांच्या २ मुलांनी या वृद्धाला बाहेर काढले. एवढ्यावर न थांबता परिवारापर्यंत पोहचवण्याचे कामही या तिघांनी केले.
मालाड येथून सासवड येथे केटरिंगचे काम करण्यासाठी गणपत विश्राम गोरीवले (वय ६०) हे आले. काम झाल्यानंतर केटरिंगमधील मुलांनी त्यांना येथेच सोडून दिले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते पायी हडपसरमध्ये आले. येथील एका हॉटेलमध्ये ते काम करू लागले. काम झाल्यावर मात्र त्यांना राहण्याची समस्या जाणवू लागली. त्यांनी पुणे-सासवड रस्त्यावरील कालव्याच्या पुलाखाली निवारा शोधला. तेथे ते दिवसभर काम करून संध्याकाळी राहत होते. गेले ८ दिवस हा दिनक्रम सुरू होता. मालाडला जाण्यासाठी पैसे जमा झाले होते. उद्या सकाळी जाण्याचे ठरले. त्याच रात्री कॅनॉलमधील पाणी वाढले आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.
रविवारी (दि.१३) रोजी संध्याकाळी या कालव्याला पाणी सोडले होते. तेव्हापासून त्यांना बाहेर येता येत नव्हते. पुलाखालील दगडी कठड्याचा आधार घेऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. आज दुपारी दोनच्या सुमारास स्थानिक महिलांना ते दिसले. गेले २ दिवस पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांची अवस्था फार बिघडली होती. त्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे होते. त्यांना पाहिलेल्या महिलांनी येथील सामाजिक कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांना ही माहिती कळवली. त्यानंतर बच्चूसिंग टाक व त्यांचा मुलगा आझाद सिंग टाक, भगतसिंग टाक यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांचा जीव वाचवला. त्यांना बाहेर काढले. गोरीवले यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा कामानिमित्त इंदापूर येथे असतो तर मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी मालाडला असते. त्यांना सुखरूप बाहेर काढून जेवण दिले. त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला.
शिवाय त्यांना पुणे स्टेशनवरून ट्रेनने मालाडला पोहोचवण्याची व्यवस्था ही केली. बच्चूसिंग यांनी आत्तापर्यंत १२५ लोकांना अश्या धोकादायक अवस्थेतून बाहेर काढले आहे.
त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही!महिला आणि बच्चूसिंग टाक व त्यांच्या मुलांच्या मदतीमुळे मला जीवदान मिळाले. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. घरी जाण्यासाठी पै-पै जमवत होतो. मध्येच असा प्रसंग आल्याने मी घाबरलो होतो. मला कॅनॉलमध्ये पाणी आल्याने बाहेर पडता आले नाही. जाणाºया-येणाºयांना गोणपाट हातात घेऊन मदतीसाठी हाक देत होतो. हे तिघे पोहत आले आणि मला हाताला धरून बाहेर काढले. मला पोहता येत नव्हते.- गणपत विश्राम गोरीवलेआतापयर्यंत जिवंत व पाण्यात मृत अवस्थेत वाहत आलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. अनेक वर्षे ही सेवा मी करत आहे. माझ्या सोबत आता आझादसिंग व भगतसिंग ही माझी दोन्ही मुलेही हे कार्य करत आहेत.
-बच्चूसिंग टाक, सामाजिक कार्यकर्ते