ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.१९ : दौैंड तालुक्यातील कुरकुंभ परिसर सोमवारी पहाटे हादरला. येथील औद्योगिक वसाहतीमधील ईटरनीस या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. यात दोन कंत्राटी कामगार ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींवर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रिजनंदन दास (वय ५०), बिनकुमार साहू (वय २०, दोघेही रा. बिहार, सध्या रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, ता. दौंड) असे मृत कामगारांची नावे आहेत, तर विपुल करंजे व विक्रम व्हावळ जखमी झाले आहेत.सोमवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हा स्फोट झाला. त्याची तीव्रता मोठी असल्याने कुरकुंभ गावापर्र्यंत हादरा बसला. काही ग्रामस्थ झोपेतून जागे होऊन भूकंप झाला, म्हणून घराबाहेर पडले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील ईटरनीस (पूर्वीची हिन्दुस्तान) रासायनिक उत्पादन करणारी एक कंपनी आहे. यामध्ये रासायनिक अभिक्रिया करताना मोठ्या प्रमाणात हायड्रोजन गॅसचा वापर केला जातो. सोमवारी (दि. १९) पहाटे ओटीबीपी (हायड्रोजेशन)प्लांटमध्ये स्टायरिन आॅक्साईड व हायड्रोजन या रासायनिक अभिक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटामुळे या कंपनीमधील वीजसेवा बंद झाल्याने मदतकार्य सुरू करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. ज्यांना मदत देणे शक्य झाले त्यांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्ष अपघाताच्या जागेवर असणाऱ्या कामगारांना जागेवरून हलताच आले नाही.
स्फोटाच्या तीव्रतेमुळे तीन मजल्यांचा हायड्रोजन प्लांट अक्षरश: कोसळला. त्यामुळे तेथील कामगार रिअॅक्टरखाली दबले गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झाले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, अतुल भोसले, राहुल सोनवणे यांनी भेट दिली. झालेल्या घटनेचा तपास सुरू आहे.सुरक्षिततेचे तीन-तेरा हायड्रोजनसारख्या गॅसचा स्फोट होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधील अन्य कारखाने व लोकवस्तीला घातक परिणाम भोगावे लागू शकतात. याबाबत सुरक्षा यंत्रणेचा अभाव हा एक प्रकारे जीवघेणा खेळच कामगारांसोबत खेळला जात असल्याची परिस्थिती आहे.