पुणे : भरधाव वेगाने जाणा-या वाहनांच्या धडकेमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पौड आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ महिलेसह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पौड रस्त्यावरील वनाझ मेट्रो स्थानक परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिला मृत्युमुखी पडली. सुनंदा चंद्रकांत सावंत (वय ७३, रा, कुलकर्णी चाळ, गुजरात कॉलनीजवळ, कोथरूड) असे मयत ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक तुकाराम अशोक बनसोडे (वय ३१, रा. हिंगणे होम कॉलनी, कोथरूड) याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी खंडेराव कराटे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनंदा सावंत सोमवारी ( दि. ११ ) दुपारी साडेचारच्या सुमारास वनाज मेट्रो स्थानकाकडून पौड रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव मोटारीने सावंत यांना धडक दिली. गंभीरजखमी झालेल्या सावंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील करत आहेत.
दुसरी घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुनील बाबुराव जगदाळे (वय ४२, रा. गगटे गठवाडी, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक हबीबुल्ला अब्दुल्ला कोयाथंगल (वय ३९, रा. पुलामंथोल, ता. पेरिन्थलमन्ना, जि.मल्लापुरम, केरळ) याच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजाराम कोलते (वय ५४) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौकातून मंगळवारी (११ मार्च) दुपारी दुचाकीस्वार सुनील जगदाळे निघाले होते. त्यावेळी दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जगदाळे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस हवालदार दिनेश रासकर तपास करत आहेत.