लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रावेत येथील एका भूखंडाच्या टीडीआरचा प्रस्ताव नामंजूर करण्यास जाणूनबुजून विलंब करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील एका उपअभियंत्याला व एका कनिष्ठ अभियंत्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या दोन्ही अभियंत्यांना सक्त ताकीद देऊन दोघांचीही नगररचना विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. मूर्तीखरेदी, शवदाहिनी अहवालातील दोषींवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात संजय अनंत तुपसाखरे हे उपभियंता, तर सुनील सिद्धप्पा बेळगावकर हे कनिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत आहेत. रावेत येथील दत्तकृपा सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटे यांनी सर्व्हे क्रमांक ९५, प्लॉट क्रमांक ५७ या भूखंडाचे हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) प्रमाणपत्रातीलक्षेत्र खर्ची टाकण्यासाठी उपअभियंता संजय तुपसाखरे व कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, भूखंडाजवळ नऊ मीटर रुंद रस्ता असेल, तरच टीडीआरचे क्षेत्र खर्ची टाकता येते. मात्र रावेतमधील या भूखंडाजवळ सहा मीटर रुंद आहे. त्यामुळे पाटे यांचा अर्ज तातडीने नामंजूर करणे आवश्यक असताना तुपसाखरे व बेळगावकर यांनी अर्ज नामंजूर करण्यास जाणूनबुजून विलंब केला. त्यामुळे नगररचना उपसंचालकांनी तुपसाखरे व बेळगावकर या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर या दोघांनीही खुलासा केला. मात्र, त्यावर समाधान न झालेल्या नगररचना उपसंचालकांनी दोघांवरही कारवाईची शिफारस करणारा अभिप्राय आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला. त्याच्या आधारे आयुक्त हर्डीकर यांनी उपअभियंता तुपसाखरे व कनिष्ठ अभियंता बेळगावकर दोघांनाही सक्त ताकीद दिली. तसेच दोघांचीही नगररचना विभागातून उचलबांगडी करत पाणीपुरवठा विभागात बदली केली. आयुक्त हर्डीकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बेशिस्तपणाला लगाम लावला आहे.
दप्तरदिरंगाई भोवली पालिकेतील दोन अभियंत्यांना
By admin | Published: June 26, 2017 3:52 AM