पिंपरी: रिक्षातून बहिणीच्या घरी जेवायला जात असताना एकाने रिक्षा अडवून भांडायला सुरुवात केली. त्यावेळी एकमेकांशी भांडणाचे नाटक करून पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने मुलीस फूस लावून पळवून नेले. आकुर्डी येथे खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौका दरम्यान रविवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली.
बालाजी कार्ले (वय २४, पनवेल), असे आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीने या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी पनवेल येथील आहे. तिची मोठी बहीण असलेली फिर्यादी महिला पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी आली. बहिणीच्या नणंदेच्या घरी जेवणाचे आमंत्रण असल्याने अल्पवयीन मुलगी, तिची मोठी बहीण आणि बहिणीची सासू रिक्षाने जात होते. त्यावेळी आरोपीने रस्त्यावर थांबून त्यांची रिक्षा थांबवली. तू मला ओळखत नाही का, असे आरोपीने अल्पवयीन मुलीला विचारले. त्याला मुलीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला शपथ घेण्यास सांगितले. त्यामुळे मुलीने त्याला मारहाण केली. यात तो खाली पडला. त्यामुळे मुलगी, तिची मोठी बहीण व सासू खूप घाबरल्या. आईला आणण्यासाठी मोठी बहीण आणि तिची सासू रिक्षातून घरी गेले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी घटनास्थळी थांबली होती. तिची मोठी बहीण घटनास्थळी परत आली तेव्हा अल्पवयीन मुलगी आणि आरोपी तेथे नव्हते. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, आरोपी हा मुळचा लातूर येथील असून, कामाच्या शोधात तो पनवेल येथे गेला होता. तेथे त्याच्या बहिणीकडे तो राहायला होता. अल्पवयीन मुलगी पनवेल येथून तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी आल्याने तो देखील पिंपरी- चिंचवड शहरात आला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याने पळवून नेले, असे पोलिसांनी सांगितले.