यवत : पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दोघांना भरधाव वेगातील मर्सडिज बेंझ गाडीने उडविल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात शनिवारी (दि. ८) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान भांडगाव गावाच्या हद्दीत घडला.महामार्गाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दोघांना उडविणारी आलिशान गाडी पुणे जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याच्या जवळच्या नातेवाइकाची असल्याची चर्चा आहे. अपघातात विजय पांडुरंग कदम (वय ४५, रा. शेगेवाडी, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर धोंडीराम सीताराम थोरवे (वय ५०, ता. खटाव, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे बाजूकडून इंदापूर बाजूकडे जाणाऱ्या आलिशान मर्सडिज बेंझ गाडीने (एमएच ४२ एएच ५००) जोरदार धडक दिल्याने सदर अपघात घडला. - अपघात करणारी आलिशान गाडी माजी मंत्र्याच्या जवळच्या नातेवाइकाची असल्याची माहिती मिळाल्याने सर्व यंत्रणा तत्परतेने हलली. मात्र, अपघात झाला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दोघांना धडक देणारा चालक नेमका कोण होता, याची माहिती मात्र मिळू शकली नव्हती.
वाहनाने दोघांना उडविले
By admin | Published: April 11, 2017 3:46 AM