पुणे : कुकडी डावा कालवा तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पवना प्रकल्पात ४.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, त्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. तर चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठी ३.५ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यातून पहिले उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत तर पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा मागणीप्रमाणे देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भीमा खोरे, कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि.प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, नगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच टँकरसाठी पाणी स्रोत आदींचे नियोजन करावे. या प्रकल्पातून शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरून पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल.
कालव्यांची गळती असल्यास ती काढण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १५.८६५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे १ मार्चपासून पाणी सोडण्याचे या बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तन २ घ्यावे किंवा कसे याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा
पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टीएमसी, औद्योगिक व इतर खासगी संस्थांना ०.४६ टीएमसी असे बिगर सिंचनासाठी देण्यात येणार आहे. सिंचनासाठी उन्हाळी हंगामात ०.२५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. चासकमान प्रकल्पातही चासकमान व कळमोडी धरण मिळून एकूण ५.२५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, त्यापैकी वहनक्षय, बाष्पीभवन व्यय वगळता उन्हाळी हंगामासाठी ३.६३ टीएमसी पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध आहे. पिण्यासाठी ०.१३ टीएमसी आणि सिंचनासाठी ३.५ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यातून सिंचनासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन असून, पहिले उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत तर पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा मागणीप्रमाणे द्यावे, असे पवार म्हणाले.
भामा आसखेडमधूनही पिंपरीला पाणी
भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा असून, पिंपरी चिंचवड महापालिकेला १ टीएमसी, सिंचन व बिगर सिंचनासाठी २.०२ टीएमसी पाणी उपलब्ध असून, जलाशयातून उपसा ०.०७ टीएमसी आणि धरणाच्या खालील नदी व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी १.९५ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भामा व भीमा नदीत पहिले आवर्तन १ मार्च ते १६ मार्च व पुढील आवर्तन २० एप्रिलपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.