लोणी काळभोर : व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शोध पथकाने लातुर येथे सुमारे १० ते १२ किलोमीटर सिनेस्टाईल थरारकपणे पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुन करणारा अल्पवयीन असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी एकूण १० जणांना अटक केली आहे.
पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार , याप्रकरणी हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह त्यांचा साथीदार निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर यापुर्वी बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे.
रविवार १८ जुलैला रात्री ८ - ४५ वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांची अल्पवयीन मुलगा व निलेश आरते या दोघांनी मिळून हत्या केली. आखाडे यांच्यावर उपचार सुरु असताना २० जुलैला त्यांचा मृत्यू झाला. अशोका हॉटेलचे मालक जयवंत खेडेकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेऊन तपास केला. त्याने हॉटेलचा व्यवसाय वाढवण्याचे उददेशाने खून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
परंतु मुख्य हल्लेखोर फरार झाले होते. सदर पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सलग सात दिवस सतत तपास करून दोघांचा पुणे, अहमदनगर, बार्शी, सोलापुर, लातुर, उस्मानाबाद जिल्हयात शोध घेत ते दोघे लातूर येथील गांधी चौकात असल्याची माहिती मिळाली. शनिवार २४ जुलैला पोलिसांनी येथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोघ दुचाकीवरून पळून गेले. त्यानंतर सुमारे १० ते १२ किलोमीटर थरारकपणे पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले. यांतील अल्पवयीन मुलावर दरोड्याची तयारी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरते हा पुणे शहर व पुणे जिल्हा हददीतुन दोन वर्षाकरीता तडीपार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे) हे करीत आहेत.