पुणे : बोपदेव घाटात दुचाकीस्वाराला मारहाण करून हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी मारणे टोळीमधील दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या दोघांना युनिट १ गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.
अभिषेक ऊर्फ नन्या उदय मारणे (वय २१, रा. मंदिराजवळ मु. पो. माळेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) आणि अक्षय अशोक सावले (वय २३, रा. गणेश मंदिराजवळ मु. पो. खामबोली, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. २९ ऑगस्टला रात्री १ च्या सुमारास बोपदेव घाटात मारणे टोळीने दोघांना लुटले. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात ४ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र अभिषेक मारणे, अजय जाधव याच्यासह १ जण २०१९ पासून पोलिसांना गुंगारा देत होते. गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनावणे यांना या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक ऊर्फ नन्या मारणे हा घोटावडे फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांचा संशय आल्याने आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात केला. मात्र, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. साथीदारांसह गुन्ह्यात सहभागी असल्याचे त्यांनी कबूल केले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार सुशील जाधव, दत्ता सोनावणे, विजयसिंह वसावे, अशोक माने, शशिकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, मीना पिंजण यांनी केली.