लोणावळा : वैद्यकीय शिक्षणासाठी लोणावळ्यातून युक्रेन (Ukraine) देशात गेलेल्या दोन मुली सध्या युक्रेन शहरातील ओडेसा या भागात आडकल्या आहेत. युक्रेन देशात महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी शिक्षणासाठी गेले होते. रशिया व युक्रेन देशात युद्ध भडकल्याने हे विद्यार्थी वेगवेगळ्या भागात आडकले आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये लोणावळ्यातील महेक प्रदिप गुप्ता व मोनिका मारुती दाभाडे या दोन विद्यार्थींनीचा देखील समावेश आहे.
सहा वर्षांपूर्वी त्या शिक्षणासाठी युक्रेनला गेल्या होत्या. पुढील दोन तीन महिन्यात शिक्षण संपवून त्या भारतात येणार होत्या. मात्र अचानक युद्ध भडकल्याने त्या युक्रेन देशात आडकल्या आहेत. दोन्ही मुलींचे आई, वडिल व नातेवाईक त्यांच्या संपर्कात आहेत. सध्या त्या ज्या भागात आहेत येथे युद्धजन्य परिस्थिती नसली तरी त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची भावना दोन्ही मुलींचे आई वडिल व नातेवाईकांसह सर्व लोणावळाकर नागरिक करत आहेत.
पुणे जिल्हाधिकारी, स्थानिक मावळचे खासदार, आमदार, तहसीलदार या प्रमुख मंडळींनी याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली करत त्यांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. युक्रेन मधून त्यांना पोलंड अथवा अंधेरी या देशांमध्ये खाजगी वाहनांमधून सुरक्षितामधून भारताचा झेंडा व आम्ही भारतीय विद्यार्थी आहोत असे बोर्ड लावून जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र ओडेसा ते पोलंड हा जवळपास 14 ते 16 तासांचा रस्ता मार्ग असल्याने व सर्वत्र हल्ले होत असल्याने तो प्रवास देखील सुरक्षित नाही. यामुळे दोन्ही मुली ओडेसा येथेच आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अन्य नेते मंडळींनी प्रयत्न करावेत अशी हाक त्यांच्या आईवडिलांनी दिली आहे.