पुणे - दादा कोण, या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी एकमेकांवर पिस्तुले रोखण्याचा प्रकार मंगळवार पेठेत सोमवारी रात्री घडला़ याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना अटक केली आहे.याप्रकरणी तन्वीर शेख (वय २८, रा. ताडीवाला रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ३५, रा़ नाना पेठ), तुषार अंकुश कदम (वय २४), बंटी संजय दाभेकर (वय १८, दोघे रा़ आंबेगाव पठार), विरेश भीमाशंकर कुंभार (वय ३३), शाकीब फारूक शेख (वय २१, दोघे रा़ नाना पेठ), प्रशांत ज्ञानदेव आल्हाटे (वय ३६, रा़ हडपसर) या ६ जणांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ गायकवाड आणि तन्वीर शेख या दोघांमध्ये वाद आहेत. तन्वीर शेख आणि त्याचे मित्र मंगळवार पेठेतील खड्डा गॅरेज चौकात सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास उभे होते. तेव्हा गायकवाड आणि त्याचे साथीदार पुणे स्टेशन येथे चहा पिण्यासाठी तेथून जात होते. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही इथले दादा आहोत. या कारणावरुन ही भांडणे सुरू केली. त्यावेळी गायकवाडने त्याच्याकडील पिस्तुल गौस शेखवर रोखले. त्यानंतर गौसने त्याचे पिस्तुल गायकवाडवर रोखले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांना उलटे कोयते आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात काही जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.सोमनाथ गायकवाड (वय ३५, रा. नाना पेठ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तन्वीर शेख (वय २८), इम्तियाज नवाब शेख (वय ३२), शाहरूख अब्दुल शेख (वय २३, दोघे रा़ गुलटेकडी), आफ्रिदी उर्फ शफी मुस्ताफा शेख (वय ४५, रा़ मोमीनपुरा, गंज पेठ) या चौघांना अटक केली आहे. गौस शेख, मोसीन सय्यद, जुगनू कुरेशी यांचा शोध सुरू आहे.
भाईगिरीतून दोन गटांत तुफान हाणामारी, १० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 4:02 AM