पुणे : ‘न्यूड’ हा चित्रपट गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रसृष्टीने इफ्फीवर बहिष्कार टाकावा, असे मत काही अभिनेते, दिग्दर्शकांकडून व्यक्त होत असताना, या महोत्सवात सहभागी होऊन निषेध नोंदवला जावा, अशी बाजू मांडली जात आहे. दुसरीकडे योगेश सोमण यांनी आम्हाला पहिल्यांदाच संधी मिळत असल्याने महोत्सवात सहभागी होणार असल्याचा वेगळा सूर आळवला आहे. या मुद्दयावरुन मराठी चित्रसृष्टीत दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गोव्यातील आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमामध्ये रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट इंडियन पॅनोरमाचा शुभारंभाचा चित्रपट म्हणून निवडण्यात आला होता. या विभागांतर्गत ‘कासव’, ‘क्षितिज-एक हॉरिझॉन, ‘कच्चा लिंबू’, ‘मुरांबा’, ‘पिंपळ’, ‘माझं भिरभिरं’, ‘रेडू’, ‘इडक’, ‘व्हेंटिलेटर’ अशा नऊ मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. नामवंत ज्युरींनी निवड केलेली असतानाही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘न्यूड’ न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने इंडियन पॅनोरमाचे ज्युरी सुजय घोष यांच्यासह काहींनी राजीनाम्याने अस्त्र उगारले. मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल रवी जाधव आणि शशीधरन या दोघांनीही समाजमाध्यमांवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. योगेश सोमण यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, ‘वर्षापूर्वी ‘माझं भिरभिरं’ हा चित्रपट बनवला. मला इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणच्याचे स्वप्न होते. ती संधी या चित्रपटाने मिळाली. याचा आनंद सगळ्या टीम बरोबर शेअर करतोय, तोच कोणते तरी दोन सिनेमे यातून वगळले गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि बहिष्कार टाकण्याची टूम निघाली. ज्यांनी अनेकदा असल्या महोत्सवात सहभाग घेतलाय वा पुरस्कारही मिळवलेत, त्यांनी आम्हाला बहिष्कार टाकावा, असं आवाहन केलं. मला आणि माझ्यासारख्या पहिल्यांदा महोत्सवात निवडलं गेलेल्यांना जायचंय आणि आम्ही जाणार.’या महोत्सवावर सर्व मराठी दिग्दर्शक, निर्माते, अभिनेत्यांनी बहिष्कार घालावा, अशी भूमिका दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मांडली आहे. दुसरीकडे, योगेश सोमण यांच्या ‘माझं भिरभिर’ या चित्रपटाचीही निवड झाली असून, बहिष्काराला विरोध करत महोत्सवात सहभागी होण्याचे ठरवले आहे. योगेश सोमण, कविता महाजन, सुमित्रा भावे, नितीन वैद्य अशा अनेक कलाकारांनी याबाबत मते मांडली आहेत. महोत्सवावर बहिष्कार घालावा की महोत्सवामध्ये जाऊन जाहीर निषेध नोंदवावा, याबाबबत मतमतांतरे असल्याने दोन गट निर्माण झाले आहेत.याबाबत उमेश कुलकर्णी म्हणाले, ‘सरकारच्या या निर्णयाविरोधात ज्युरींचे अध्यक्ष सुजय घोष यांनी राजानामा दिला आहे. या निर्णयाविरोधात सर्व दिग्दर्शकांनी एकत्र येऊन भूमिका घेतल्यास सरकारवर दबाव निर्माण करणे शक्य होईल आणि वगळलेल्या दोन्ही चित्रपटांचा पुन्हा महोत्सवात समावेश करणे शक्य होईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सहन करणे अयोग्य आहे.’‘कासव’च्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे म्हणाल्या, ‘नऊ मराठी सिनेमांच्या निर्माते, दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एकजुटीने निर्णय घेतल्यास तर माझाही पाठिंबा असेल. याबाबत मोहन आगाशे योग्य निर्णय घेतील. मात्र, ‘कासव’ इफ्फीमधून माघार घेत असल्याबाबत अद्याप ठरलेले नाही.’
हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे. प्रादेशिक चित्रपटांच्या सर्जनशीलतेचा गळा घोटणारा आहे. या महोत्सवावर बहिष्कार घालण्याची भूमिका काही मित्रांनी घेतली आहे. बहिष्काराऐवजी महोत्सवात जाऊन सरकारच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे. मुरांबा हा माझा चित्रपटही या महोत्सवासाठी निवडला गेला आहे. मुरांबाची सर्व टीम महोत्सवात जाऊन आपला निषेध व्यक्त करणार आहे. जगभरातील सिनेमाचे जाणकार तसेच रसिक तेथे असणार आहेत. त्यांच्या साथीने व समक्ष हा निषेध झाला पाहिजे.- नितीन वैद्य, दिग्दर्शक, मुरांबा
एकीकडे खजुराहो आपल्या देशात असल्याचा अभिमान आणि दुसरीकडे हे अतोनात संकोच. इतका काळ इतक्या चर्चा झाल्या, पण नग्नता आणि अश्लीलता यातला भेद आपल्याला अजून कळायला तयार नाही. संस्कृती नावाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक. यांचा संस्कृतीचा, इतिहासाचा धड अभ्यास नाही आणि उचित, तर्कशुद्ध विचार करण्याची कुवतही नाही; केवळ दुटप्पीपणा यांच्यात ओतप्रोत भरलेला आहे. अशा कारणांस्तव सुमारांशी झगडण्यात कोणत्याच चांगल्या कलावंतांची उर्जा वाया जाऊ नये, असं मनापासून वाटतं. - कविता महाजन