जेजुरी : पिसर्वे ( ता. पुरंदर ) येथे पिसर्वे व माळशिरस येथील दोन गटांत झालेल्या धुमश्चक्रीत एकाला प्राण गमवावा लागला. राजेंद्र पोपट खेंगरे, (वय २५, रा. माळशिरस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल केले असून अजूनही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. महिनाभरापूर्वी फिर्यादी सदाशिव कोलते यांचे माळशिरस येथील नातेवाईक गणपत यादव आणि त्यांचा मुलगा मयूर यांची त्यांच्याच भावकीतील नवनाथ सुरेश यादव व सागर संतोष यादव यांच्याशी एका ढाब्यावर जेवणावरून भांडण झाले होते. यावरून दि. २८ मार्च रोजी पिसर्वे गावाच्या यात्रेत पुन्हा झगडा झाला होता. याचे पर्यवसान दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माळशिरस येथील २० ते २५ जणांचा एक गट पिसर्वे येथे सदाशिव कोलते यांच्या घरी जाब विचारण्यासाठी आला होता. या वेळी तरुणांच्या या गटाने त्यांना व त्यांची पत्नी रतन यांना काठी, लाकडी दांडके, तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पत्नीच्या गळ्यातील व कानातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. दुसऱ्या गावातील तरुण आपल्या गावात येऊन मारहाण करताहेत हे पाहून पिसर्वे येथील तरुण गोळा झाले व त्यांनी काठ्या, लाकडी दांडकी, लोखंडी गजाने माळशिरस येथून आलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात राजेंद्र खेंगरे हा जबर झखमी झाला. गावातील तरुण गोळा होऊन मारहाण करू लागल्याने बाहेर गावावरून आलेले तरुण त्यांच्या दुचाकी सोडून पळून गेले. जमलेल्या जमावाने त्या वाहनांचीही तोडफोड केली. जखमी राजेंद्र यास उपचारासाठी यवत येथे नेले असता त्याचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी मारहाण करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांतील १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दोन गावातील दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे तेथील तणावग्रस्त वातावरण आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. (वार्ताहर)
पिसर्वे येथे दोन गटांत धुमश्चक्री
By admin | Published: March 31, 2015 12:26 AM