दीपक जाधव, पुणेमहापालिकेच्या मालकीची बाणेरमधील पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणे दोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला याची माहितीच नाही. त्यानंतर महापालिका आयुक्तांना परिसरातील नागरिकांनी याची लेखी माहिती देऊनही, त्यांना स्वत:ची जागा परत घेण्याची इच्छा होत नसल्याची चिंताजनक बाब उजेडात आली आहे.शहराचा विकास होत असताना रस्ते, मेट्रो, क्रीडांगणे, उद्याने याकरिता महापालिकेला सातत्याने जागेची चणचण भासत असते, त्याकरिता लोकांच्या निवासी घरांवर आरक्षणे टाकून त्यांना बेघर करण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाकडून होताना दिसून येतो. त्याचवेळी स्वत:च्या मालकीच्या जागेचे रक्षण त्यांना करता येत नसल्याचे दिसून येत आहे. बाणेरमधील तुकाई मंदिराच्या पायथ्याशी मिळकत क्रमांक-१ मधील पाण्याची टाकी दोन महिन्यांपूर्वी शेजारच्या जागामालकांनी परस्पर पाडून, त्याला पत्र्याचे कंपाउंड घालून घेतले आहे. परिसरातील नागरिक व बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर, त्यांनी तातडीने आयुक्त कुणाल कुमार यांना ही बाब निर्दशनास आणून दिली आहे. ढिम्म प्रशासन तरीही अद्याप काहीच कारवाई करायला तयार नाही. नागरिकांनी याबाबत पालिका आयुक्तांना लेखी माहिती दिलेली आहे. तरीही कारवाई झालेली नाही.बाणेर ग्रामपंचायत असताना १९८० मध्ये गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तुकाई मंदिराच्या पायथ्याशी ही टाकी बांधण्यात आली. त्याकरिता बाणेर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पैसे जमा करून दिले होते. बाणेर गाव १९९७ मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर, ग्रामपंचायतीच्या मालकीची ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली. १९८० पासून ते २०१२ पर्यंत या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होत होता. नवीन टाकी झाल्यानंतर, जुनी टाकी गेल्या ३ वर्षांपासून बंद अवस्थेत होती.पाणीपुरवठा विभागाच्या ताब्यात ही जागा होती, त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे मालमत्ता विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
टाकी पाडून बळकावली दोन गुंठे जागा
By admin | Published: April 09, 2015 5:25 AM