पुणे : कोरोना काळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाल्यावर योजनांचा लाभही भारतीयांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गोखलेनगर भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) आभार मानणारी दोनशे पत्र त्यांना पाठवली आहेत.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्या हस्ते पत्रं पोस्टात टाकण्यात आली. त्याप्रसंगी संयोजक पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजीनगर अध्यक्ष सतिश बहिरट, प्रभागध्यक्ष लक्ष्मण(अण्णा) नलावडे, नगरसेवक प्रभाकर पवार, किरण ओरसे, रोहीत लिंबोळे, रामु धनगर, रमेश भंडारी, सर्जेराव धोत्रे, स्नेहल ढावरे, युवराज गाटे, रवी जाधव, ईश्वर बनपट्टे, शैलेश चलवादी उपस्थित होते.
बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मोफत अन्नधान्य वितरण, घरोघरी जाऊन लसीकरण, आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज या पत्रांतून व्यक्त करण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.
लसीकरणाची मोहीम आणखी वेगवान करावी लागणार
देशात कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्याच बरोबरीला लसीकरणाचा वेग वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत 30% लोकांनी (29.1 कोटी) लशीचे दोन डोस घेतले आहेत, तसंच 70.7 कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे. 2021 च्या शेवटापर्यंत संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यासाठी लसीकरणाची मोहीम आणखी वेगवान करावी लागणार आहे. 100 कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. 278 दिवसात हा टप्पा पूर्ण केला याचा अर्थ देशात रोज 30 लाख डोस दिले जातात. मात्र जानेवारीपासून हा आकडा कमी जास्त होत आहे.