पुणे : पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील उमेदवारांनी सुचविलेल्या ९६ मतदानकेंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. सूक्ष्म निरीक्षक व व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून या मतदान केंद्रावर नजर ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांनी सुचविलेल्या मतदानकेंद्राचा संवेदनशील मतदानकेंद्र निश्चित करताना विचार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत १०८ संवेदनशील मतदानकेंदे्र होती. नवीन निकषामुळे त्यात दोनशेपर्यंत वाढ झाली आहे. एखाद्या मतदानकेंद्रात सर्वांत कमी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असेल व त्या केंद्रावर सिंगल व्होटरची संख्या अधिक असणारे केंद्र संवेदनशील ठरविण्यात येते. तसेच ज्या मतदानकेंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असेल व झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान एकाच उमेदवाराला झालेले असेल तर त्याचा समावेश संवेदनशील केंद्राच्या यादीत होतो. आयोगाच्या या निकषानुसार मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करून संवेदनशील मतदानकेंद्रे घोषित करण्यात आली आहेत.या शिवाय पोलिसांनी अथवा उमेदवारांनी काही मतदारकेंद्रांत गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा मतदानकेंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केल्याने, संवेदनशील मतदारसंघात वाढ झाली आहे. या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदार केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.’ (प्रतिनिधी)
दोनशे मतदान केंद्रे संवेदनशील
By admin | Published: October 09, 2014 5:36 AM