लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दरमहा १० टक्के दराने कर्ज देणाऱ्या व व्याज देण्यास उशीर झाल्यास नातेवाईकांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा सावकारी करणाऱ्यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
उमेश चंद्रकांत घारे (रा. सनसिटी, वडगाव) आणि संदीप घारे (रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सही केलेले कोरे धनादेश, सही केलेले कोरे मुद्रांक जप्त केले आहेत.
तक्रारदार यांनी २०१९ मध्ये गरजेपोटी घारे याच्याकडून २ लाख रुपये दरमहा १० टक्के व्याज दराने घेतले होते. सिक्युरिटी म्हणून कोरे धनादेश व महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी गहाण ठेवली होती. तक्रारदार यांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज देण्यास उशीर झाल्याची कारणे सांगून घारे हे वारंवार तक्रारदाराच्या घरी जाऊन त्यांना व नातेवाईकांना शिवीगाळ करीत़ जीवे मारून टाकण्याची धमकी देत. घरातील साहित्यांची मोडतोड करीत. तक्रारदारांचे एक मित्र मध्यस्थीसाठी आले असताना त्यांनी व्याजाचे सिक्युरिटीसाठी या मित्राची दुचाकी जबरदस्तीने ओढून नेली होती.
तक्रारदाराकडे २ लाख रुपये मुद्दल व २४ महिन्याचे व्याज व दंड असे सर्व मिळून १४ लाख रुपयांची ते वारंवार मागणी करीत होते. त्यांचा तक्रारअर्ज मिळाल्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अवैध सावकारी केल्याबद्दल खंडणीविरोधी पथकाने उमेश व संदीप घारे यांना अटक केली. त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात अनेक कोरे धनादेश, मजकूर न लिहिलेले व सही व अंगठा घेतलेले अनेक कोरे स्टॅम्प पेपर तसेच वाहनांबाबतची विविध कागदपत्रे, आधारकार्डच्या झेरॉक्स अशी कागदपत्रे मिळाली आहेत.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
अनेकांना अवैधरित्या कर्ज दिले
उमेश चंद्रकांत घारे व संदीप घारे यांनी अनेकांना अवैधरित्या कर्ज दिले असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडून वसुलीबाबत कोणाची तक्रार असल्यास खंडणीविरोधी पथकाशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.